उपविभागामध्ये असणार बारामती, भोर, दौंडचा समावेश
जळोची – जिल्हास्तरावरील विविध कार्यालये असणाऱ्या बारामती आता नव्याने पोलीस उपमुख्यालय उभारले जात असून बारामती उपविभागामध्ये बारामती, हवेली, भोर, दौंड विभागांचा समावेश करण्यात आला आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे शहर असणाऱ्या बारामतीतही अलीकडच्या काळात गुन्हेगारी फोफावत चालली आहे. या गुन्हेगारीलाही पायबंद घालण्यासाठी या उपमुख्यालयाचा नक्कीच उपयोग होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात शांतता तालुका म्हणून बारामती ओळखला जातो. मात्र, अलीकडील काळात वाढत्या लोकसंख्ये बरोबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याने, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच बारामती शहर आणि तालुक्यातील पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ असल्याने पोलिसांवरही ताण पडत आहे. बऱ्हाणपूर येथे होत असणाऱ्या पोलीस उपमुख्यालयामुळे येथील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
बऱ्हाणपुरात नव्याने होत असलेल्या पोलीस उपमुख्यालयात पुणे जिल्ह्यातील 8 विभागाअंतर्गत 28 पोलीस ठाण्याचा समावेश असणार आहे. जिल्ह्यात एकच पोलीस मुख्यालय असल्यामुळे पोलीस उपविभागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास. पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र मुख्यालयापासुनचे अंतर त्या-त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीत होणारी वाढ याचा विचार करता पुणे पोलीस मुख्यालयातून बारामतीत मदत पोहोचण्यासाठी तीन तासांहून अधिक काळ जातो.
अनेकदा स्थानिक पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाचा अभावी एखादा घटना प्रसंग आटोक्यात आणण्यासाठी अडचणीचे ठरत होते. आता, बारामतीतच मुख्यालय होत असल्याने या उपविभागातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
50 एकर क्षेत्रात कार्यालय…
बुऱ्हाणपुरात होणाऱ्या पोलीस उपमुख्यालयाला प्राथमिक कामकाजांना 2 कोटी मंजूर करण्यात आले असून बारामती तालुक्यात बऱ्हाणपूर येथे 50 एकर क्षेत्रांवर जिल्हा उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. प्राथमिक बाब म्हणून संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारण्यासाठी लागणाऱ्या 2 कोटी खर्चास मजुरी दिली आहे. लवकरच प्रशासकीय कार्यवाही सुरू होणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
जिल्हा उपमुख्यालयात काय असेल……
ट्रेनिग सेंटर, प्रशासकीय भवन, विभागनिहाय कर्मचारी निवासस्थाने, पोलीस हॉस्पिटल, मोटार परिवहन विभाग, शॉपिंग सेंटर, बहूद्देशीय हॉल, परेड मैदान, गोळीबार मैदान, पोलीस अधिकारी व कर्मचारी विश्रांतीगृह, स्विमिंग पूल याबाबींचा समावेश या कार्यालयात असणार आहे.