काश्‍मीरातील लोकांना भेटण्यात पोलिसांचा अडथळा

गुलामनबी आझाद यांची तक्रार
श्रीनगर: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुमतीनुसार तीन दिवसांच्या काश्‍मीरच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी आज अनंतनाग जिल्ह्यात जाऊन तेथील सरकारी हाऊसिंग कॉलनीतील लोकांची भेट घेतली. येथील डाक बंगल्यावर ते लोकांना भेटणार होते पण पोलिसांनी त्यांना तेथे अशी भेट घेण्यास नकार दिल्याने त्यांना कार्यक्रमाचे स्थळ बदलावे लागले.

आपण श्रीनगरात असताना तेथे काही लोक आपल्याला भेटायला येऊ इच्छित होते पण त्यांना पोलिसांनी अनुमती दिली नाही अशी तक्रार आझाद यांनी केली आहे. काश्‍मीरात कलम 370 हटवण्यात आल्यानंतर गुलामनबी आझाद यांनी तीन वेळा काश्‍मीरात जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना विमानतळावरूनच माघारी पाठवण्यात आले होते. पण यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना तेथे तीन दिवसांची भेट देण्याची अनुमती मिळाली आहे. शनिवारी आझाद यांनी लल्ला देढ रूग्णालयात जाऊन तेथील रूग्णांची भेट घेतली तर काश्‍मीरातील हाऊस बोट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.