पुणे: अॅट्रॉसिटीची भीती दाखवून डॉक्टरकडून 75 लाख रूपयांची खंडणी उकळणाऱ्याला धमकावून पाच लाख रुपये घेतलेल्या पोलीस मित्र जयेश भगवानदास कासट (वय 42, रा. एरंडवणा) याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. याची पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
याप्रकरणी डॉ. हेमंत तुकाराम अडसुळ (वय-55, रा. सहकारनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत नारायण पेठ आणि सैलीसबरी पार्क येथे घडली.
फिर्यादी यांचा भाऊ मनोज अडसुळ याने डॉ. दिपक रासने यांच्याकडून 75 लाख रूपये घेतले होते. त्यातील पाच लाख रुपये जयेश याने धमकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी जयेश याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी बाजू मांडली. तर, फिर्यादीच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. हितेश सोनार आणि अॅड. दिग्विजय ठोंबरे यांनी बाजू मांडली.