पोलीसच आढळले न्यायालयात थुंकताना

न्यायालयाने उपटले कान : पोलीस उपायुक्‍तांना तपास करून अहवाल देण्याचे आदेश

पुणे – न्यायालयाच्या आवारात थुंकणाऱ्या व्यक्‍तींवर कायदेशीर दंड करून त्यांना अद्दल घडविणाऱ्या पुणे जिल्हा न्यायालयाने आता पोलिसांचेदेखील कान उपटले आहेत. गुरुवारी न्यायालयाच्या आवारात दोन पोलीस कर्मचारी तंबाखू खाऊन थुंकताना आढळले. त्यांच्यावर कारवाई करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पोलीस उपायुक्‍तांना 15 दिवसांत तपास करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आवारात तंबाखू, गुटखा, खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करणार, असे पत्रक जिल्हा न्यायालयाने काढले होते. त्यानुसार अनेकांवर कारवाईदेखील करण्यात आली. गुरुवारी पुणे बार असोशिएशनची निवडणूक असताना तिथे हजर असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी नियमांचे उल्लंघन केले.

मतदान केंद्रावर एक पोलीस हवालदार थुंकत असल्याचे ऍड. विकास शिंदे, ऍड. राहुल वंजारी, ऍड. प्रतिक जगताप यांच्या लक्षात आले. याप्रसंगी शिंदे यांनी संबंधित पोलीस हवालदाराचे थुंकताना चित्रीकरण केले. यानंतर नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एस. बी. पाटील (एसी कोर्ट) यांच्या न्यायालयाबाहेर ऍड. शिंदे व ऍड. ढवळे थांबले असताना शेजारील खिडकीजवळ त्याच न्यायालयातील एक पोलीस हवालदाराने तंबाखू तोंडात टाकली आणि काही वेळाने खिडकीत थुंकून टाकली. याचेही सर्व चित्रीकरण करण्यात आले आहे.

पुढे हा सर्व प्रकार अतिरिक्‍त सत्र व जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्याकडे ऍड. शिंदे यांनी लेखी तक्रार करून निदर्शनास आणून दिला. यावर जिल्हा न्यायधीशांनी न्यायालयाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्या त्या दोन पोलीस हवालदारांची चौकशी करून त्यांच्यावर येत्या 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलीस उपआयुक्‍तांना दिले आहेत.

न्यायालयात स्वच्छता ठेवावी याची जबाबदारी केवळ वकिलांची नव्हे तर सर्वांची आहे. यापूर्वी नागरिकांना स्वच्छता राखावी यासाठी आवाहन करण्यात आले. त्यांनी नियमांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केल्यानंतर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात आली. मात्र, ज्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी केली जाते त्यांच्याकडूनच नियम धाब्यावर बसवले जात असल्यास ही गंभीर बाब आहे.
– ऍड. विकास शिंदे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.