पोलिसांनी शोधली वाहतूककोंडीची 42 ठिकाणे

कोंडीची कारणे जाणून घेत उपाययोजना सुरू

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात सध्या वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. वाहतूक पोलिसांनी अशी 42 ठिकाणे आणि वाहतूक कोंडीची कारणे शोधून काढली आहेत. तसेच त्यावर उपाययोजनाही सुरू केली आहे. वाहतूक कोंडीची सर्वाधिक ठिकाणे ही चाकण आणि हिंजवडी परिसरात आहेत. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्‍त श्रीकांत डिसले यांनी पुढाकार घेतला आहे. तर चिंचवड, निगडी आणि देहरोड-तळेगाव विभागामध्ये एकही वाहतूक कोंडीचे ठिकाण नाही.

पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी निर्माण होत आहे. या भागात खासगी ट्राफिक वॉर्डनची नियुक्‍ती केल्यास ही समस्या सुटू शकते. तर वाकड, हिंजवडी भागातून लाखो वाहने आयटी क्षेत्रात जात असल्याने याही भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

तर वाकडमधील सयाजी आणि सूर्या अंडरपास येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत वाहतूक विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेची यापूर्वीच पत्रव्यवहार केला आहे. तर वाकडमधील कोंडी होणाऱ्या इतर ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि वॉर्डनची नियुक्‍ती करण्याबाबत सांगण्यात आले आहे. हिंजवडीमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही ठिकाणी खासगी बसचा मार्ग बदल्यात आला आहे. तर जादा वर्दळीच्या वेळी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

चाकण भागातील औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. तसेच काही ठिकाणी बेशिस्त रिक्षा चालक आणि पादचारी मार्ग नसल्याने वाहतूक कोंडी होते. या भागातील काही चौकांमध्ये सिग्नल बसविणे, तसेच पादचारी पुलाची उभारणी करण्याबाबतच्या उपाययोजना प्रशासनास सुचविण्यात आल्या आहेत.

तळवडे भागातील जादा गर्दीच्यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिग्नल बंद करून वाहतूक पोलिसांकडून नियमन करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिलेल्या आहेत. तसेच या भागातील रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. भोसरीतील देहूफाटा आणि पांजरापोळ ही वाहतूक कोंडीची ठिकाणे असून या भागात अंडरपास किंवा ओव्हर ब्रिज करणे आवश्‍यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. पिंपरीतील शगुन चौक, मेन बाजार, कराची चौक, साई चौक आणि रिव्हर रोड ही वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. या भागातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनची गरज आहे.

ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी संबंधित वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांना गर्दीच्यावेळी स्वतः दोन तास थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. मात्र कायमस्वरूपी समस्या सुटण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना संबंधितांनी करणेही गरजेचे असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– श्रीकांत डिसले, सहायक आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.