53 लाखांचा मुद्देमाल नढवळमध्ये जप्त दहा जणांवर गुन्हा दाखल
वडूज – खटाव तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई करून वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत पोलिसांनी 53 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दहा जणांवर गुन्हे दाखल केला आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली अशी, खटाव तालुक्यातील नढवळ येथे बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती परीक्षाविधीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी नढवळ येथे त्यांच्या पथकाने छापा टाकला.
त्याठिकाणी असणारे जेसीबी, डंपर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू चोरी करत असल्याचे आढळून आले. तेथे वाळू चोरी करणारे एक जेसीबी, एक डंपर, दोन ट्रॅक्टर पकडले. याप्रकरणी प्रतीक दीपक बडेकर, राजेंद्र लालासो जाधव, निलेश अशोक जाधव, प्रवीण धनाजी जाधव, बाळू उमेश चव्हाण (सर्व रा. वडूज), किशोर चंद्रकांत बागल (रा. डाभेंवाडी), अमोल बाबा बुधावले (रा. दुर्गेवाडी), वैभव साळुंखे (रा. गणेशवाडी), वैभव गुरव (रा. कुरोली), संजय बरकडे (रा. नढवळ) या दहा जणांवर रात्री उशीरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. दहापैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार जण फरार आहेत.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख, पो. हवा इनायतुल्ला मुल्ला, अंकुश यादव, सचिन रिटे, प्रसाद शिंदे, तेजस भोसले, अकबर खान आदींसह वडूज पोलीस ठाण्याचे पो. नि. अशोक पाटील व वडूज पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. अधिक तपास पो. हवा धनाजी वायदंडे करीत आहेत.