गजानन टोम्पे ः भीमाशंकर येथे दुचाकी-चारचाकी चालकांची ब्रिथ ऍनालायझरद्वारे तपासणी
भीमाशंकर/डिंभे – श्री क्षेत्र भीमाशंकरला शुक्रवार (दि. 21) महाशिवरात्र यात्रेवर प्रशासन व पोलीस लक्ष ठेवणार आहेत. यासाठी भीमाशंकर पार्किंग परिसरामध्ये प्रत्येक दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी ब्रिथ ऍनालाझर मशीनव्दारे केली जाणार आहे. यामध्ये दारू पिणारी व्यक्ति, गाडीत दारूच्या बाटल्या व धांगडधिंगा घालताना कोणी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन टोम्पे यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शुक्रवार (दि. 21) होणाऱ्या महाशिवरात्र यात्रेमध्ये भाविकांची सुरक्षितता व भाविकांना जास्तीत जास्त पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाच लाभ घेता यावा यासाठी घोडेगाव व खेड या दोन पोलीस ठाण्यांनी आपला वेगवेगळा बंदोबस्त नेमला आहे. तसेच बॉम्बशोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्कॉड, हॅंडमेटल डिडेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा व मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बाटलीतून पेट्रोल-डिझेल विक्रीला बंदी
भीमाशंकरला महाशिवरात्र यात्रेत पिपंळगाव घोडे ते भीमाशंकर दरम्यान असणारे अवैध धंदे व बाटलीतील पेट्रोल/डिजेल विक्री धंदे या गोष्टींना यात्रा काळात बंद करण्यात आली असल्याच्या सूचना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
प्लॅस्टिकमुक्त यात्रा करण्यावर देवस्थानचा भर
यात्रा स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मंदिरामध्ये गंगाजल म्हणून दिल्या जाणा-या बाटल्याही पूर्ण बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणा-या भाविकांनी प्लॅस्टिक घेऊन येऊ नये, कोठेही कचरा घाण टाकू नये, असे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
घोडेगाव पोलीस ठाण्याने भीमाशंकर देवळाकडे जाताना वाहन क्रमांक चार येथे मोठ्या बसचे पार्किंग केले आहे. तीन व दोन पार्किंगला लहान गाड्या व एक नंबर पार्किंगला दोनचाकी गाड्यांचे पार्किंग केले आहे. यासाठी अधिकारी 20 व पोलीस कर्मचारी 180 असे एकूण 200 पोलीस कर्मचारी आहे. तसेच ब्रिथ ऍनालायझर मशीनव्दारे मद्यप्राशन तपासणीसाठी वेगळे पथक तैनात केले असून, पार्किंग ते मंदिर जाण्यासाठी एसटीच्या 20 मिनीबस व देवस्थानकडून 10 मिनीबस ठेवण्यात आल्या आहेत.
-प्रदीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक