“पोलीस दादा’ थॅंक्‍स!

वाहतूक नियम पाळणाऱ्यांना “आभार’द्वारे प्रोत्साहन

पुणे – वाहतूक पोलीस घोळक्‍याने चौकांमध्ये उभे असतात.. विनाकारण वाहतूक पोलीस “टार्गेट’ करतात.. वाहतूक पोलीस “अव्वाच्या सव्वा’ दंड वसूल करतात.. दंड वसूल करताना अरेरावी केली जाते.. वाहतूक कोंडीकडे मात्र पोलिसांचे लक्ष नाही.. ही आणि अशी अनेक वाक्‍ये रोज वाहतूक पोलिसांच्या विरोधात ऐकायला मिळतात. मात्र, वाहतूक पोलिसांबाबत “ही योजना उत्तम आहे, थॅंक्‍स’ असेही वाक्‍य ऐकायला मिळते. याचे कारण आहे, वाहतूक विभागाची “आभार’ योजना. जून ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे 30 हजारपेक्षा अधिक “आभार’ कूपन वाहनचालकांना दिले असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवले आणि वाहनावर कोणताही थकीत दंड नसेल, नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकाला वाहतूक पोलिसांकडून “आभार’ कूपन देण्यात येते. जून महिन्यापासून राबवण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत हजारो वाहनचालकांना कूपन दिले. या कूपनला अधिकाधिक सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर आवर्जुन कूपन मिळाल्यानंतर वाहनचालक “आभार’ मानत असल्याची भावना वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी दै. “प्रभात’शी बोलताना व्यक्‍त केली.

कूपनद्वारे वाहनचालकाला मिळालेल्या क्रमांकानुसार वाहनचालकाला हॉटेल्ससह विविध दुकाने आणि “स्विगी’, “झोमॅटो’ या सारख्या “फूड डिलेव्हरी साईट’वर देखील सवलत मिळते.

“आभार’ कूपन्स मिळालेल्या वाहनचालकांपैकी बहुतांश जणांनी कूपन्सचा सर्वाधिक उपयोग “प्रसिद्ध’ खाद्यपदार्थांसाठी केला आहे. सुमारे 150 अधिक व्यावसायिकांनी स्वेच्छेने या योजनेमध्ये सहभाग घेतला असल्याचे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहतूक पोलीस केवळ दंड आकारतात, अशी कल्पना अनेकांच्या मनात आहे. मात्र, या योजनेद्वारे पोलीस नियम पाळणाऱ्यांना “प्रोत्साहन’ देखील देतात. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नियम पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी नियमांचे पालन केले पाहिजे. वाहतुकीला शिस्त लागावी, असा यामागील हेतू आहे. “आभार’ योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक

Leave A Reply

Your email address will not be published.