पुणे – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी रंगेहात पकडले. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत.
शुभम आरवडे (वय 22) , वैभव मळेकर (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वैभव हा पिंपरी-चिंचवड वॉर्ड क्रमांक 1 च्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे.
खडकी परिसरातील एका बसस्टॉप परिसरात आरोपी रेमडेसिविर इंजेक्शन जवळ बाळगून त्याची जास्त किमतीला विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या प्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता, हे रेमडेसिविर कोठून आणले? आणखी कोणाला विकले आहे का? आणखी इंजेक्शनचा साठा केला आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भानुप्रिया पेठकर यांनी केली.