पुणे : मेसर्स पुनावळे मेडिकलचा खोटा शिक्का आणि मागणी पत्राद्वारे औषधाची खरेदी केल्याप्रकरणात एकाला वाकड पोलिसांनी अटक केली.
त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही.मोहिते यांनी दिला आहे.
श्रीराम बालाजी रुपनर (थेरगाव, मूळ. हग्रंगा, ता. निलंगा, जि. लातुर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ज्योती लक्का यांनी काम पाहिले. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. खंडेराव टाचले आणि ऍड. मनिष मगर यांनी बाजू मांडली.
याबाबत भाग्यश्री यादव (वय 42, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. 19 ऑक़्टोबर 2019 ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत ही घटना घडली. गुन्ह्यातील 53 हजार रुपये किंमतीचा औषधाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
हे औषध खरेदी करून मेसर्स कैलास इंटरप्रायझेस यांची आणि मेसर्स आरती फार्मा शिवाजीनगरची फसवणूक केली आहे. या प्रकरणात रुपनर याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी ऍड. ज्योति लक्का यांनी केली.
तर, आरोपीला या गुन्ह्यात खोटे गुंतविले आहे. त्याचा या गुन्हाशी संबंध नाही. कॉस्मेटिक ऍक्ट जामिनपात्र आहे. भादवी 467 आणि 468 लागू होत नसल्याचा युक्तीवाद ऍड. खंडेराव टाचले यांनी केला.