पुणे : सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून करून 65 हजार रुपये लांबविणाऱ्या उत्तरप्रदेश येथील तरुणाला 15 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भाजीमंडई जवळ असलेल्या मैदानाशेजारी 7 ते 8 मे च्या दरम्यान ही घटना घडली.
अफसर अस्लम अली (वय 19, रा. वारजे माळवाडी, मुळ. उत्तरप्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. शहाबाई अरुण शेलार (वय 65, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सातारा पोलीस दलातील त्यांचा मुलगा विठ्ठल यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भंगार विक्रीकरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. डोक्यात राॅड मारून त्यांचा खून करण्यात आला.
पोलिसांनी उत्तरप्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अली याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, तसेच गुन्हा करताना अंगावर असलेले कपडे जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.