वाघोली -पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी डॉ. अभिनव देशमुख यांची नेमणूक झाल्यापासून जिल्ह्यातील काही अवैध धंदे बंद झाले. तर काही भागातील अवैध धंद्यांचे जाळे संपुष्टात येऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. हवेली तालुक्याचा बरचसा भाग पुणे शहरालगत आहे.
पुणे शहराचे उपनगरीय भाग म्हणून ओळखला जातो. या भागात ग्रामीण भागातील बंद असलेले धंदे चालकांनी उपनगरात आपले बस्तान बसविले आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीणच्या हद्दीवर असणाऱ्या या अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद झाल्याने येथील नागरिकांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला आहे. अवैध धंदे चालकांकडून लाखो रुपयांची उलाढाल चालू आहे. या अवैध धंदे चालकांवर पुणे शहर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.
हवेली तालुक्यातील अनेक वाईन शॉप सकाळी लवकर उघडली जातात. रात्री अकरा साडे अकरापर्यंत ही वाइन शॉप खुल्या पद्धतीने देशी विदेशी दारूची विक्री करतात. राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाने वेळेचे बंधन न पाळणाऱ्या वाईन शॉपची झाडाझडती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गुटख्याचे रॅकेट बंद करा
पुणे जिल्ह्यात पानटपरीवर मिळणारा गुटखा बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांना गुटख्यावर अंकुश मिळवता येईल. यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात आहेत, मात्र या गुटख्यावर सध्यातरी पूर्ण अंकुश मिळवता आले नसल्याचे चित्र आहे.
गावठी दारू हद्दपार करा
नदीच्या काठालगत राजरोसपणे गावठी दारू बनवण्याचे अड्डे आजही अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. मुळा-मुठा तसेच भीमा नदीच्या पात्रालगत अवैधपणे गावठी दारू बनवणारे अड्डे पोलिसांनी जरी उध्वस्त केले असले तरी ते पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे या दारु अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे वाढती गुन्हेगारी कमी झाली आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य जिल्हा परिषद