श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका पोलीस कॉन्स्टेबलला वीरमरण आले. श्रीनगरमधील त्या घटनेत एक दहशतवादी जखमी झाल्याचे समजते.
दहशतवाद्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. तीन दहशतवादी प्रवास करत असलेल्या कारचा पाठलाग पोलिसांच्या पथकाने केला. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. त्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
चकमकीनंतर दहशतवाद्यांची कार भरधाव वेगाने निघून गेली. त्या कारचा आणि दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली. संबंधित दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली.