पुणे/लोणीकाळभोर – लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे शहर आयुक्तालयांतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याबाबत लेखी आदेश नसल्याने तसेस लोकप्रतिधींकडून विरोध होत असल्याने सध्या तरी याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ही दोन्हीही पोलीस ठाणी अद्यापही ग्रामीणमध्येच असल्याचे पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी स्पष्ट केल्याचे तसेच याकामी गृह विभागाकडे आपण पाठपुरावा करावा, असे सांगितल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या गृह विभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तालयाची पाच झोनमध्ये पुनर्रचना करण्यास परवानगी दिलेली आहे. यानुसार लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात घेण्याची चर्चा आहे. परंतु, गृह विभागाच्या अद्यादेशात लोणी काळभोर व लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे शहर आयुक्तालयात करण्यात यावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. यातूनच नागरिकांत संभ्रम निर्माण झालेला आहे.
या पार्श्वभुमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी पोलीस आयुक्त अभिवन गुप्ता यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात शासनाने अद्यादेश जारी केला असला तरी याकामी अद्याप तरी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे तसेच ही दोन्ही पोलीस ठाणी अद्यापही ग्रामीण मध्येच असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
याबाबत कटके यांनी सांगितले की, लोणीकंद आणि लोणीकाळभोर पोलीस ठाणी शहर आयुक्तालयात जोडताना वाघोली वगळता पूर्व हवेलीमधील एकही गाव सामाविष्ठ करण्यास आमचा विरोध आहे. वाघोली परिसरचा समावेश पालिकेत होणार असल्याने वाघोलीसाठी पुणे शहर आयुक्तालया अंतर्गत स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु व्हावे, अशी आमची भुमिका आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही पाठपुरावा सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याशी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी हवेली शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर, सुधीर फराटे, मिलिंद हरगुडे आदी उपस्थित होते.