येरवडा – करोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विश्रांतवाडी परिसरात बंदोबस्त सुरू होता. टिंगरेनगर येथील कुमार समृद्धी सोसायटी येथील आजींचा वाढदिवस असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. वाढदिवस साजरा करून आजींचे आशीर्वाद घ्यावेत. या विचारातून पोलिसांनी तत्काळ नियोजन केले.
संध्याकाळी सातच्या सुमारास पोलीस निरीक्षक रवींद्र कदम हे आपल्या इतर सहकाऱ्यांसह सोसायटीत पोहोचले. अचानक सोसायटीत पोलीस आलेले पाहून सोसायटीतील नागरिक भांबावून गेले. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुमन शिंदे यांना त्यांच्या मुलगा आणि सून यांच्यासोबत खाली बोलावले. पाहतात तर काय, विश्रांतवाडी पोलीस चक्क शिंदे आजींच्या 84व्या वाढदिवसानिमित्त केक आणि पुष्पगुच्छ घेऊन आले होते. सुमन शिंदे आजीसह त्यांचे कुटुंबीय व सोसायटीतील नागरिक या अनौपचारिक सोहळ्यामुळे भारावून गेले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी आजींचे आशीर्वाद घेतले. केक कापण्यात आला. यामुळे सुमन आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले त्यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी सोसायटीत येऊन शिंदे आजींचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सोसायटीतील संचालक मंडळ व नागरिक देखील अचंबित झाले.
करोना आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शिंदे आजींचा वाढदिवस साजरा करत असताना आनंद होत आहे. शिंदे आजींचे आशीर्वाद आम्हा सर्वांच्या पाठीशी असल्याचे समाधान आहे, असे पोलीस निरीक्षक रवीद्र कदम यांनी सांगितले.