मोदींच्या सभेसाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात: मदतीला आले धनंजय मुंढे

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभा प्रचारानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी परळीमधील सभेने त्यांच्या प्रचाराची सुरवात झाली. या सभेच्या बंदोबस्तासाठी गेलेल्या बीड पोलिस दलातील दंगल प्रतिबंधक पथकाच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात 15 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनास्थळी राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे हे तातडीने अपघातग्रस्त पोलिसांच्या मदतीला धावून आले होते.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे हा अपघात झाला आहे. जखमींना माजलगाव, बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींनी गुरूवारी सकाळी परळीत जाहीर सभेला संबोधित केले. गोपीनाथ मुंडेंच्या कर्मभूमीत आलो आहे. मराठवाडा ही संतांची पावन भूमी आहे. एकाचवेळी ‘वैद्यनाथ’ आणि ‘जनता जनार्दन’ अशा दोन देवांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले, असे मोदींनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही कलम 370 चा नारा कायम ठेवला. कलम 370 ला विरोध केल्याप्रकरणी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. या वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल. देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.