समाज माध्यमावरील खोट्या संदेशाकडे पोलिसांचे लक्ष

पुणे – निवडणुकीच्या काळात समाज माध्यमावर अनेक प्रकारचे संदेश येतात त्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भात खोट्या बातम्या पसरविल्या जातात. त्याकडे सायबर पोलिसांचे लक्ष आहे.

निवडणुकांच्या दिवशी अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांमुळे बराच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्या पसरविल्या जाऊ नयेत याची काळजी घेण्यात येत आहे. मुंबई सायबर पोलिसांनी या संबंधात या क्षेत्रातील लॉजिकली नावाच्या कंपनीबरोबर सहकार्याने काम सुरू केले आहे. गेल्या 20 दिवसांपासून समाज माध्यमावरील संदेश आदर्श आचार संहितेचा भंग तर, करत नाहीत ना याची शहानिशा केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लॉजिकली ही कंपनी भारतातील इतर राज्यात सायबर पोलिसांशी सहकार्य करता येईल का, या शक्‍यतेवर विचार करीत आहे.

त्याचबरोबर समाज माध्यम हे क्षेत्र उत्क्रांत होत आहे. त्यामुळे यंत्रणा ही वेळोवेळी विकसित करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेकदा एखाद्या उमेदवारापेक्षा त्याचे समर्थक उलट-सुलट बातम्या समाजमाध्यमावरून पसरवित असतात. समाज माध्यमे विकसित झाल्यानंतर त्याचा प्रभाव निवडणुकांवर पडत आहे. त्यामुळे निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी आधुनिक काळात समाज माध्यमावरील खोट्या संदेशाकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे झाले आहे, असे या कंपनीचे संस्थापक लिरिक जैन यांनी सांगितले.

खोट्या बातम्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू
मतदान केंद्राबाबत खोटी माहिती बसविल्यास त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावर लगेच आळा घालण्याची गरज पडते. लोकसभा निवडणुकावेळी अनेक खोटे संदेश समाज माध्यमावर फिरत होते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी तर, निवडणूक रद्द झाली आहे किंवा निवडणुकीचे ठिकाण बदलले आहे अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जातात. त्याचा निवडणुकावर परिणाम होऊ शकतो. अर्थात खोट्या बातम्या पसरवण्याचे प्रकार पूर्णपणे थांबविले जाऊ शकत नाहीत, ते कमी करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)