टाकळी ढोकेश्वर (वार्ताहर) – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील ढोकी टोलनाक्यावर (ता. पारनेर) जीपमधून प्राणघातक हत्यारे घेऊन जाणाऱ्या दोघांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.6) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (दि.6) पारनेर पोलीस ठाण्यातील पो. कॉ. सूरज कदम यांना नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ढोकी फाट्यामार्गे पांढऱ्या रंगाच्या जीपमधून चौघे जण तलवारी विक्री करण्याकरिता जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, पो. कॉ. सत्यजित शिंदे, भालचंद्र दिवटे, सूरज कदम, श्रीनाथ गवळी, अजिंक्य साठे यांना ढोकी टोलनाका येथे सापळा लावला. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ढोकी फाट्यामार्गे पांढऱ्या रंगाची जीप (क्र. एमएच 16 बीएच- 5980) टोलनाक्यावर आली. ही जीप थांबली. यावेळी आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी जीप सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यातील दोघांना ताब्यात घेतले, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी अक्षय संजय पोपळे, नजीमुद्दीन बाबूलाल शेख ( दोघे रा. म्हसे, ता. श्रीगोंदा) यांची व जीपची झडती घेतली असता, दोन तलवारी आढळल्या. पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोपळे व शेख व पळून गेलेले सोमनाथ सुरेश पठारे व राजेश रमेश फाळके या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.