अॅमेझॉनचा डिलिव्हरी बॉय दुचाकीचे क्रमांक बदलून करायचा छेडछाड
पिंपरी (प्रतिनिधी) – रस्त्याने जाणाऱ्या महिलांचा विनयभंग करुन पळून जाणाऱ्या एका तरुणास अखेर पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी अॅमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला असून रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या अनोळखी महिलांना पाठीमागून चापट मारुन पळून जात होता. यासाठी तो दुचाकी बदलायचा तसेच पहिल्या व शेवटच्या नंबरवर सेलोटेप लावायचा. महिला या प्रकाराची तक्रार करण्यास पुढे येत नव्हत्या. परंतु एका डॉक्टर महिलेने तक्रार केली आणि पोलिसांनी हर्षल विकास भेगडे (वय 28, रा. महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, अक्षदा चौक, पिंपळे निलख) या आरोपीला अटक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी एक डॉक्टर महिला आपल्या पतीसोबत मॉर्निग वॉकसाठी गेली होती. त्यावेळी तिचा आरोपी भेगडे याने दुचाकीवरून येऊन विनयभंग केला. पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना एका दुचाकीवरील पहिल्या व शेवटच्या आकड्यांवर सेलोटेप लावलेले दिसून आली. उर्वरित दोन नंबरवरून पोलिसांनी एमएच-12-एसएन-3244 हा दुचाकीचा क्रमांक मिळविला. त्यानंतर आरटीओमध्ये नोंदणी असलेल्या क्रमांकावर पोलिसांनी फोन लावला. मोबाइल धारकाचे नाव दर्शविणाऱ्या ऍपवर पोलिसांचे नाव बघून तुम्ही पोलीस बोलत आहात काय, असे म्हणून फोन बंद केला. पोलिसांनी तांत्रिक महितीच्या आधारे आरोपीला अटक केली.
आरोपी हा चांगल्या घरातील असून तो अॅमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्याकडे तीन दुचाकी आहेत. ओळख पटू नये म्हणून तो गाडीच्या पहिल्या आणि शेवटच्या क्रमांकावर सेलोटेप लावत असे. त्याने आत्तापर्यंत विशालनगर व आसपासच्या परिसरात अनेक महिलांचा विनयभंग केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या महिलांचा अशाप्रकारे विनयभंग केला असेल त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्या सर्व महिलांची नावे गुप्त ठेवली जातील, असे वाकड पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, कर्मचारी विक्रम जगदाळे, सचिन नरूटे, बिभिषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, नितिन गेंगजे, बाबाजान इनामदार, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, नितिन ढोरजे, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, शाम बाबा, सुरज सुतार, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, सुरेश भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.