पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने अटक केलेल्या तिघांना जामीन 

पुणे: अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट या संघटनेच्या नावाने लोकांकडून साडेतीन लाख रूपये उकळ्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना चुकीच्या पध्दतीने अटक केल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजूमदार यांनी तिघांना जामीन मंजुर केला.

याप्रकरणी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांवेळी त्यांच्या पोलीस कोठडीला बचाव पक्षाचे वकील ऍड. डॉ. चिन्मय भोसले यांनी विरोध केला. फौजदारी प्रक्रिया दंड संहिता (सीआरपीसी) कलम 41 अ नुसार आरोपींना अटक करण्यापूर्वी नोटीस बजावणे आवश्‍यक होते. ज्या प्रकरणांमध्ये सात वर्षांपर्यंत शिक्षा होते, अशा सर्व प्रकरणांमध्ये पोलिस थेट आरोपींना अटक करू शकत नाही. अशा प्रकारे जर कारवाई करण्यात आलेली असेल तर संबंधितांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे, असा युक्तीवाद ऍड. डॉ. चिन्मय भोसले यांनी न्यायालयात केला.

त्यानुसार न्यायालयाने तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर बचाव पक्षाने अर्ज केल्यानंतर राहुल हरिभाऊ येवले (वय 28), अशोक मारूती येवले (40 दोघे रा. पाचाणे, चांदखेड, ता. मावळ), ज्ञानेश्‍वर अर्जुन केदार (42 रा. उत्तमनगर, वारजे) या तिघांना जामीन मंजुर केला. याबाबत रवींद्र रामचंद्र शेतसंघी (30 रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली होती. आरोपी मनोज ऊर्फ मनोहर कुंडलिक येवले, त्याचा भाऊ राहुल आणि इतर दोघांनी माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मु. पो. माण, ता. मुळशी, पुणे या नावाने बनावट पावती पुस्तक तयार केले. फिर्यादींकडून बळजबरीने अनंत माथाडी ट्रान्सपोर्ट या संघटनेच्या नावाने पैसे घेऊन फसवणूक केली. अशा प्रकारे इतर लोकांकडून आतापर्यंत तीन लाख 50 हजार रूपये एक ते दीड वर्षांच्या कालावधीत घेतले, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.