कोल्हापूर – गावठी बनावटीच्या पिस्तूलांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी फाट्याजवळ ही कारवाई केली. या कारवाईत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या शुभम शिंदे याच्यासह खरेदी करणाऱ्या आदिनाथ बडेकर आणि शर्मेश राठोड या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ पिस्तूल आणि ११ राऊंड जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेले हे ३ आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. ऐन गणेशोत्सवात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून पिस्तूल तस्करीचे हे मोठ रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांची कुंडली काढायला सुरवात केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी या अनुषंगाने माहिती मिळवल्यावर गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाडी येथिल शुभम शिंदे हा बेकायदा पिस्तूल वापरत असल्याचे तसेच तो पिस्तुल खरेदी विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर मंगळवारी शिंदे आपल्याकडील पिस्तुल विकण्यासाठी कणेरीवाडी फाटा परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी तिथे छापा टाकून शिंदेसह पिस्तुल खरेदीला आलेल्या रायगड जिल्ह्यातील आदिनाथ बडेकरला अटक केली. या दोघांकडील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बडेकरने याआधी शिंदे कडून २ पिस्तुल आणि ४ राऊंड खरेदी केल्या होत्या. त्या नवी मुंबई, कामोठे परिसरातील शर्मेश राठोड याला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात राठोडला ही अटक केली असून त्याच्याकडील हत्यार आणि राऊंड देखील जप्त करण्यात आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिंदेने जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुल पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळेच या टोळीच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथकाने केली आहे.