कल्याण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा भाऊ असल्याचे खोटे सांगून अनेकांची लाखों रुपयांची फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नोकरीचे आमिष दाखवून आणि स्वस्त दरात सोने देतो म्हणून त्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी सूनेवर गुन्ह्यांचा आळ घातला. त्यानंतर तिच्या मुलाला म्हणजे नातवाला घेऊन ते पळून गेले. अखेर महिलेने आपल्या पती आणि सासऱ्याची सर्व माहिती पोलिसांना दिली.
सविस्तर माहिती अशी की, माझे भाऊ नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत. तुम्हाला नोकरी लावतो, स्वस्तात सोने खरेदी करून देतो म्हणत डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या अनेक जणांकडून राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी यांनी लाखो रूपये घेतले. पण कुणालाच नोकरी लागली नाही किंवा सोने मिळाले नाही.
लोकांना जेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे समजले तेंव्हा त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यानंतर राजन गडकरी आणि मुलगा आनंद गडकरी, राजनची पत्नी आणि आनंदच्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन पसार झाले. पण ते आनंदची पत्नी गीतांजली गडकरी हीला सोबत घेऊन गेले नाहीत. आपल्या मुलाला आपल्याशी तोडून हे पळून गेल्याने गीतांजलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कारण तिच्याच बँक खात्यातून तिचा पती आणि सासऱ्याने सर्व व्यवहार केले होते.
या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अमोल पलसमकर यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गीतांजली हिच्या कबुली जबाबानुसार ती माफीची साक्षीदार झाली. तिने सासरे आणि पतीचे सगळे कटकारस्थान पोलिसांना सांगितले. तिने फसवणुकी संदर्भात आपल्याला काही एक माहित नसल्याचा जबाब पोलिसांकडे दिला.
फक्त मला माझा चार वर्षाचा मुलगा परत आणून द्या. या आरोपींना लवकरात लवकर शोधा, अशी मागणी सून गीतांजली गडकरीने केली होती. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांचे दोन पथक तपासासाठी रवाना झाले होते. अखेर अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली.