न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
पुणे : विरोधी टोळीतील व्यक्तीला जेवण देत असल्याच्या संशयावरून हॉटेलात चालक आणि त्याच्या भाच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करणाऱ्या दोघांना न्यायालयाने 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे.
खुशाल भानुदास तापकीर (वय 34, रा. वडमुखवाडी, ता. हवेली) आणि टोळीप्रमुख सोन्या ऊर्फ मनोज रामदास घुले (वय 29) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत.
मनोज याच्यावर 5, तर खुशाल याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. चऱ्होली खुर्द येथील 25 वर्षीय हॉटेल चालकाने याबाबत आळंदी पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना 30 डिसेंबर 2019 रोजी घडली होती.
या प्रकरणात यापूर्वी तीघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य चार ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ऍड. विजय फरगडे यांनी काम पाहिले. तर, बचाव पक्षातर्फे ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले.