मंचर (पुणे) -मंचर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे हरविलेले दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या दोन तासांत मूळ मालकास परत मिळाले.
एकलहरे (ता. आंबेगाव) येथील रविकिरण हॉटेलमध्ये दहा तोळे हरविलेले सोन्याचे दागिने मूळ मालकाला परत मिळण्यासाठी पोलीस जवान सोमनाथ वाफगांवकर यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी अर्चना संजय मोहिते (दोघे रा. कळंबोली, मुंबई) हे शुक्रवारी (दि. 18) लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे गेले होते. शनिवारी (दि. 20) ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना पुणे-नाशिक रस्त्यावरील एकलहरे येथील हॉटेल रविकिरण येथे कुटुंबीयासह चहापाणी करण्यासाठी थांबले होते. त्यानंतर त्यांच्या खासगी वाहनातून मुंबई येथे जाण्यासाठी रवाना झाले.
सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेलमध्येच राहिल्याचे अर्चना संजय मोहिते लक्षात आले. पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स नव्हती. सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्या ठिकाणचा कॅमेरा बंद होता. मंचर पोलीस ठाण्याचे तुकाराम मोरे यांना या प्रकाराबाबत त्यांनी माहिती दिली. त्यावेळी पोलीस जवान सोमनाथ वाफगांवकर यांनी तत्परता दाखवत त्यांची पूर्ण माहिती घेऊन पर्समधील मोबाईलचा नंबरचे पुण्याच्या सायबर पोलीस ठाण्यातून लोकेशन घेतले. हा मोबाईल चाकण -आळंदी फाटा ते आळंदी रोडच्या दरम्यान असल्याचे समजले. त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरणचे मालक युवराज कानडे यांना संपर्क केला. युवराज कानडे यांनी हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ झाल्याचे सांगितले.
लग्न प्रमुख लक्ष्मण खोसे यांना त्यांचे लोकेशन विचारले असता ते आळंदी परिसरात असल्याबाबत सांगितले. वाफगावकर यांनी वऱ्हाडाच्या सर्व गाड्या तात्काळ तेथेच थांबवून पर्सचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यावेळी नजर चुकीने टेबलवर राहिलेली ही पर्स त्यांच्या गाडीत आली होती. मोहिते दाम्पत्याने लक्ष्मण खोसे यांच्या घरी जाऊन दागिन्यांची पर्स ताब्यात घेतली. त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाईल फोन मिळाल्याने त्यांनी मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस जवान सोमनाथ वाफगांवकर तसेच लक्ष्मण खोसे आणि महेंद्र खोसे यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.