‘ना सासर ना माहेर’; 25 वर्षीय महिलेवर अंत्यविधीसाठी पोलीसच आले समोर

राजगुरुनगर (प्रतिनिधी) : तिला क्षयरोग झाला होता. आजाराने शेवटची पायरी गाठली होती, त्यात परित्यक्ता, तिची आई सुद्धा तिच्या माहेरी भावाकडे राहायची, वडिलांचेही घर नव्हते…अशा परिस्थितीत तिच्या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले, म्हणून पुण्याला न्यायचे होते. पण, रुग्णवाहिकाही लवकर उपलब्ध झाली नाही. शेवटी वयाच्या पंचविशीतच तिला मृत्यूने गाठले. पण, अंत्यविधी कोणी करेना. शेवटी येथील माजी सरपंच प्रदीप कासवा आणि दोन हवालदार यांनी माणूसकीची भावना दाखविली आणि त्या दुर्देवी तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

खेड तालुक्यातल्या पश्चिम भागातील एका गावात मामाशेजारी व म्हाताऱ्या आईसोबत राहणाऱ्या परित्यक्ता तरुणीला क्षयरोगाने ग्रासले होते. मंगळवारी (दि.२६) तिची तब्येत अधिकच बिघडली, म्हणून म्हाताऱ्या आईने भाच्याला घेऊन कसेबसे येथील चांडोली ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले. मृत्यूपंथालाच लागलेली असल्याने येथील उपचारांना मर्यादा होत्या. म्हणून औंध येथे न्या, असे रुग्नालयातून सांगण्यात आले. तरीही दुर्दैव एवढे की, रुग्णवाहिकाही वेळेत मिळाली नाही. शेवटी ग्रामीण रुग्णालयातच तीचे निधन झाले.

खेड पोलिस ठाण्यात हवालदार संतोष मोरे रात्रपाळीला होते. ते चांडोली रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी रवाना झाले. महिलेचा नवरा नगर जिल्ह्यात आहे. त्याला फोन केले, पण त्याने कोरोनामुळे येणे शक्य नाही, असे सांगितले. मामाकडचे लोक म्हणाले, ‘आधीच कोरोनाच्या अफवा आहेत, मृतदेह इकडे आणून त्यांना खतपाणी नको. तिकडेच काय ते पहा.’ ती रात्र अशीच निघून गेली.

हवालदार संतोष मोरे यांच्यापुढे पर्याय होता की, बेवारस म्हणून प्रेत शवागारात पाठवायचे. पण, म्हातारी आई असताना बेवारस तरी कसे म्हणायचे? मोरे यांच्या मनाला पटेना. त्यांनी राजगुरुनगरचे माजी सरपंच प्रदीप कासवा यांचा सल्ला घेऊन कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आणि गॅसदाहिनीत स्वखर्चाने अंत्यविधीची तयारी केली. हवालदार संतोष मोरे, स्वप्नील गाढवे, पोलिस पाटील नवनाथ काळोखे यांनी तिघांमध्ये पैसे जमा करून अंत्यविधी आणि रुग्नवाहीकेचा खर्च भागविला आणि म्हाताऱ्या आईला आणि मृतदेहाला घेऊन अमरधाम स्मशानभूमी गाठली.

म्हातारी आई, माजी सरपंच प्रदीप कासवा, हवालदार संतोष मोरे, स्वप्नील गाढवे, पोलिस पाटील नवनाथ काळोखे अशा सात जणांमध्ये त्या दुर्दैवी जीवाचा अंत्यविधी येथील गॅसदाहीनीत केला आणि या प्रसंगाने खाकी वर्दीतील माणूसकी व्यक्त झाली, अशी चर्चा शहरात सुरु झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.