कराडात पोलीस अलर्ट

कराड  – तांबवे व महारूगडेवाडी येथे करोनाबाधित रूग्ण सापडल्याने कराड शहरात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील असणाऱ्या चौकात वाहनांची कसून तपासणी सुरू झाली आहे. या दरम्यान आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या संयुक्‍तिक कारवाईत शेकडो वाहने जप्त करण्यात आली. तर या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी केली जात होती. त्यामुळे तालुक्‍यातील करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे.

लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात पोलीस व प्रशासन नागरिकांना शिथीलता देईल अशी अपेक्षा होती. परंतु, तालुक्‍यात करोनाबाधित दोन रूग्णांची संख्या वाढली. मुंबईस्थित असणारे नागरिक करोनाच्या भितीने आपल्या मुळगावी दाखल झाले आहेत. परंतु, आपल्याला होणाऱ्या त्रासाचा कोणालाही थांगपत्ताही लागू न देता परस्पर स्थानिक खासगी रूग्णालयात उपचार घेण्याचा प्रयत्न करणारे तांबवे व महारूगडेवाडी येथील प्रत्येकी एकास करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

कराड शहरात सुमारे एक लाखापर्यंतचे मनुष्यबळ असून ग्रामीण भागातील करोना संसर्ग शहरात शिरकाव करू नये याकरिता प्रशासन प्रचंड काळजी घेताना दिसून येत आहे. कराड नगरपालिका, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरटीओ, आरोग्य विभाग, आदी विभागांनी ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. परंतु, प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या डोकेदुखीमध्ये भरच पडेल अशा पद्धतीचे नागरिकांचे वर्तन दिसून येऊन लागल्याने अखेर पोलिसांना आपल्या खाक्‍या दाखविण्याची वेळ आली.लॉकडाऊनला अकरा दिवस पूर्ण झाले. तर येत्या 14 एप्रिलला लॉकडाऊन शिथील होईल किंवा उठवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात लॉकडाऊन मध्ये प्रशासनाकडून शिथीलता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली आहे.

गुरूवारी, पोलीस व आरटीओ प्रशासनाने शहरातील वाहतूक पूर्णपणे बंद केली. नाकेबंदीवर पोलीस पहारा वाढवला. तर मुख्य रस्त्यांवर भेदा चौकात आरटीओ व पोलिसांच्या संयुक्‍तिक कारवाईत शेकडो वाहने जप्त केली. यावेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात होती.
दरम्यान, लॉकडाऊनच्या सुरूवातीपासूनच पोलिसांनी जीवनावश्‍यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहरात फिरणाऱ्या अनेक दुचाकी वाहनांवर कारवाई केली आहे. तसेच आजच्या कारवाईत पकडण्यात आलेली शेकडो वाहने ठेवण्यासाठी पोलिसांकडे जागा नसल्याचे समोर आले.
कारवाईत सातत्य गरजेचे…

कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नागरिकांची ये-जा रोखण्यात आली आहे. मात्र, तरीही नागरिक पळवाटा शोधून शहरातून फेरफटका मारताना सातत्याने दिसतात. अशांवर पोलीसही खाकीचा दंडूका उगारतात. मात्र, हा दंडूका सातत्याने होणे गरजेचे आहे. एक दिवस कारवाई आणि बाकी दिवस पोलीस कुठे गायब असतात हेच कोणाला कळत नाही. परिणामी घरी बसून कंटाळलेले अनेकजण बाहेर पडून गर्दी करतात. त्यासाठी पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.