विविध ठिकाणी करणार नाकाबंदी
पिंपरी – नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टीफस्ट डिसेंबरला तरुणांकडून मोठा जल्लोष करण्यात येतो. मात्र, या जल्लोषाला काही मद्यपींकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न होतो. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबदारी घेतली असून, 31 डिसेंबर दिवशी पोलिसांकडून शहरातील विविध भागांमध्ये अचानक नाकाबंदी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मद्यपान करून फिरणारे पोलिसांच्या कचाट्यात सापडणार असून, अशा लोकांवर कारवाईचा बडगादेखील उगारण्यात येणार आहे.
मद्यपीकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सण तसेच इतर वेळी निगडीतील भक्ती-शक्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, मोशी टोलनाका, तळवडे आयटी पार्क चौक, नाशिक फाटा, पिंपरी चौक, देहूरोडमधील सेंट्रल चौक आदी ठिकाणी नाकाबंदी केली जाते. दरवर्षी 31 डिसेंबर रोजीही याच ठिकाणी पोलीस नाकाबंदी करून तपासणी मोहीम करीत असतात. मात्र, नेहमीच्या नाकाबंदीचे पॉइंट अनेकांना माहीत झालेले असतात. त्यामुळे मद्यपींसह गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही या मार्गाने न जाता इतर मार्गांचा वापर करतात.
ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पोलिसांनी नवीन शक्कल लढवली असून, यंदा पोलिसांकडून नेहमीच्या नाकाबंदीच्या ठिकाणांसह शहराच्या विविध भागांत अचानकपणे नाकाबंदी राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
आयुक्तालयाकडील 70 ब्रेथ नालायझरने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. यासह हुल्लडबाजांना लगाम घालण्यासाठीही ठिकठिकाणी बंदोबस्तासह गस्त वाढविली जाणार आहे. पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.