उंब्रज – वडगांव इंदोली, ता. कराड येथील खोलवड्याच्या पुलावरून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रेलर तसेच दुचाकी असा सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमाल उंब्रज पोलिसांनी जप्त करून कारवाई केली. राहूल रमेश जाधव (रा. उंब्रज) याच्यासह अन्य अनोळखी दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, मंगळवार दि. 18 रोजी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना वडगाव गावचे हद्दीत खोलवडाच्या पुलावर एक अज्ञात इसम मोटर सायकलवरून पुढे चालला होता. त्याच्यापुढे एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह चाललेला होता.
उंब्रज पोलिसांनी सदर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना त्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉंलीमध्ये वाऴू दिसल्याने ट्रॅक्टर थांबवला. यावेळी संशयित वाहन जाग्यावरच सोडून पऴून गेले. त्यांचा पाठलाग करून शोध घेतला असता ते सापडले नाहीत. सदरची वाहने उंब्रज पोलिसांनी ताब्यात घेतली. यामध्ये 5 लाख रुपयांचा सोनालिका कंपनीचा ट्रॅंक्टर क्र. एम.एच. 50 सी 5631, ट्रॅक्टर ट्रॉली व हिरो होंडा कंपनीची सीडी डॉन मोटर सायकल क्र. एम. एच. 11 ई 2360 व सहा हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाऴू असा एकूण मिळून 5 लाख 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध चोरट्या वाळू वाहतूक प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत.