वडूज – वडूजमधील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी आज उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी आज वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला.
यावेळी पोलीस कर्मचारी अमोल माने, श्री. तांबे, वाहतूक कर्मचारी नितीन निकम, श्री. शेडगे, एस. एल. काळे, श्री. मरलेकर, विवेक पाटील यांच्यासह
गृहरक्षक दलाचे शेरखान डांगे कर्मचाऱ्यांसह एकूण 40 कर्मचारी यांची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी शहरातील बेशिस्त वाहतूक, पार्किंग वेड्यावाकड्या उभ्या असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेमध्ये एकूण 29 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तर काही वाहनांच्या मालकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे. 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून रुपये 5000 दंड वसूल करण्यात आला आहे तर 4 वाहनांचे कलम 283 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर शहरातील रस्त्यालगत बसलेल्या फळविक्रेत्याना नोटीस बजावून अशा प्रकारे कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत उपविभागीय पोलीस अधिकरी महामुनी यांनी व्यक्त केले आहे.