पुणे – वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणारी नोंदणी तसेच पदवी नसतानादेखील दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरवर मुंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पी. रामकृष्ण रेड्डी (रा.केशवनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. दिनेश कृष्णराव बेन्डे (रा. गणेश विहार, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
रेड्डी हा मुंढव्यातील केशवनगर परिसरात वैद्यकीय पदवी नसतानादेखील दवाखाना चालत असल्याचा एक तक्रार अर्ज मुंढवा पोलीस ठाण्यात आला होता. दरम्यान, तो पोलिसांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठविला. अर्जाची खातरजमा करून वैद्यकीय अधिकारी परिमंडळ चारचे दिनेश बेन्डे यांनी पाहणी केली.
त्यावेळी आरोपी याने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद व महाराष्ट्र दंत वैद्य परिषद या चार पैकी कोणत्याही परिषदेकडे नोंदणी करणे आवश्यक असतानादेखील त्यांनी नोंदणी केली नसल्याचे आढळले. याबाबत उपनिरीक्षक घाटगे यांनी सांगितले की, आरोपी हा सैन्य दलाच्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाल्याचे सांगतो. त्यानंतर त्यांनी तेव्हापासून हा व्यासाय सुरू केला असल्याचे दिसून येते.