पुणे – वाहन विकत घेताना किंवा हस्तांतरण करताना ऑनलाइन भाडेकरारा बरोबर पोलिसांच्या पोच पावतीची आवश्यकता नाही. ऑनलाइन भाडेकरार करताना पोलिसांच्या माहितीसाठी स्वतंत्र व्यवस्था असून ती सर्व माहिती भाडेकराराबरोबर पोलिसांना त्वरित मिळते. त्यामुळे पोलिसांना वेगळी माहिती देण्याची किंवा त्याच्या पोचपावतीची गरज नाही. याबाबतचे परिपत्रक पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसृत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाइन भाडेकराराची नवीन प्रणाली सुरू केली आहे. जनजागृतीअभावी भाडेकरू असलेल्या नागरिकांना वाहन विकत घेताना किंवा हस्तांतरण करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर आरटीओने परिपत्रक प्रसृत केले आहे.
याबाबत असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, ‘ऑनलाइन भाडेकराराची माहिती पोलीस खात्याला मिळावी म्हणून महसूल आणि गृह खात्याने संयुक्त कार्यक्रम राबवून क्राइम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएमएस) अंतर्गत माहितीसाठी महसूल खात्याकडून पोलीस यंत्रणेला देण्यात येते. मात्र, नवीन वाहन घेणाऱ्या ग्राहकांना वाहन वितरकाकडून पोलीस पडताळणी करून त्यावर पोलीस ठाण्याचा शिक्का आणावा किंवा ऑनलाइन प्रक्रिया केल्याची प्रत द्यावी, अशी सक्ती केली जात होती.
याबाबत गेल्या महिन्यात पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा ऑनलाइन भाडेकरार दिल्यानंतर स्वतंत्र पोलीस पडताळणीची गरज नसल्याबाबत कार्यालयीन आदेश आणि परिपत्रक काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार आरटीओकडून परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे.