पॉलीकॅबचा आयपीओ

मागील आठवड्यात सुरु झालेला व ९ एप्रिलला संपणारा आयपीओ आहे. पॉलीकॅब या इलेक्ट्रिक वायर्स व उपकरणं बनवणाऱ्या कंपनीचा किमतपट्टा रु. ५३३ ते ५३८ असा निश्चित केला गेला असून एकूण १३४६ कोटी रुपयांची प्राथमिक भागविक्री ही कंपनी करत आहे. ही कंपनी एलईडी बल्ब्स, सौर उत्पादनं इ. उत्पादनं देखील बनवते.

१९९६ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीनं २००९ मध्ये ईपीसी (इंजिनीरिंग, प्रॉकरमेन्ट व कंस्ट्रक्शन) व्यवसायात पदार्पण केलं. उपलब्ध माहितीनुसार मागील वर्षात कंपनीचे ३३०० अधिकृत विक्रेते व एक लाखाच्या वरती रिटेल आऊटलेट्स आहेत. वायर आणि केबल क्षेत्रात या कंपनीचा हिस्सा साधारणपणे १८ टक्क्यांच्या पुढं आहे. ट्राफिगुरा या सिंगापूरच्या कंपनीबरोबर हातमिळवणी करत कंपनीनं गुजरातमधील वाघोडीया येथे उत्पादन प्रकल्प टाकलाय ज्यामधून २०२० पर्यंत अडीच लाख मेट्रिक टन तांब्याचे रॉड बनवले जातील असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनी ही जगातील ४० देशांत आपली उत्पादनं निर्यात करत असून कंपनीचं उत्पन्न मागील तीन वर्षांत साधारणपणे अनु. १४%, २४% व ४२ % वाढलेलं आहे. कंपनीचा ३१ डिसेंबरच्या तिमाही अखेरीस करपश्चात नफा ३५८ कोटी रु. असून त्यात मागील दोन वर्षात दुप्पट वाढ झालीय. गेल्या वर्षातील आकडेवारीनुसार या वर्षअखेरीस कंपनीचं प्रति शेअर अर्थार्जन अनुमान ३० रु. असून आयपीओच्या भावानुसार त्याचा पीई हा १८ येतो. त्याच क्षेत्रातील नामवंत कंपनी हॅवेल्सचा पीई आहे, ५९ तर केईआय चा पीई आहे, १९. कंपनीचं विक्री व विपणन पाहता हा शेअर गुंतवणुकीस चांगला वाटतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.