तहान लागल्यावर विहीर खोदणे हा तर या राजकारण्यांचा धंदा

पाटपाण्याच्या बाता मारून
बळीराजाला नेत्यांनी काढले वेड्यात
हिम्मत असेल तर राजकारण्यांनो
पाऊल ठेवूनच दाखवा खेड्यात

जर प्यायलाही पाणी मिळेना
तर सिंचनासाठी कोठून येणार
स्वातंत्र्य मिळून काळ लोटला
अजून तळतळाट किती घेणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीच तीच आश्‍वासने ऐकून
सर्वसामान्यांचे तर कानच विटले
गळ्याभोवती कर्जाचा फास
बळीराजाने अकालीच डोळे मिटले

तहान लागल्यावर विहीर खोदणे
हा तर या राजकारण्यांचा धंदा
जनतेचा फारच कळवळा येणार
कारण निवडणूक होणार यंदा

शेतकऱ्यांच्या पिढ्या बरबाद
नेत्यांची मात्र परिवारासह चंगळ
ग्रामपंचायत ते थेट मंत्रालय
साध्या साध्या कामांची टंगळमंगळ

परिवारासह मानगुटीवर
नेत्यांना पिढ्यान्‌ पिढ्यांची सवय
सत्ता कोणत्याही पक्षाची येवो
नेत्यांना फक्त सत्तेचे तोरण हवय

उंची जॅकेट भारी भारी साड्या
बनेल राजकारण्यांचे लक्षण
रात्रंदिवस बनेल राजकारणी
समाजाचेच करताहेत भक्षण

महिला मंडळांच्या कार्यक्रमातही
काही नेत्यांचा पाहून घ्यावा तोरा
आमदार अन्‌ खासदारकी म्हणजे
पुढाऱ्यांना चेकच वाटतो कोरा

निवडणुकीच्या वर्षात नेत्यांची
धडपड चालू असते केविलवाणी
सत्तर वर्षांपासून जनता ऐकतेय
तीच तीच विकासाची भेसूर गाणी

राजकारण्यांनी पोसलेली असते
लाचार भाटांची निर्लज्ज फौज
जनतेच्याच पाठिंब्यामुळे नेते
आयुष्यभर करताहेत मौज

– विजय वहाडणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)