विविधा: कवी गोविंद

माधव विद्वांस

दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी होती. आज त्यांचे सहकारी कवी गोविंद’ यांचे पुण्यस्मरण.त्यांचे संपूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 रोजी झाला.कण्हेर पोखरी हे नगर जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव. पोटापाण्यासाठी हे कुटुंब नाशिक येथे आले त्यांचे वडील गवंडी काम करीत असत. लहानपणीच त्यांचे वडील वारले. लहान असतानाच त्यांना ताप आला व त्यातच त्याचे पाय लुळे पडले आणि भावी आयुष्य अंधारातच बुडाले. तशा अवस्थेतही त्यांच्या मातोश्री आनंदीबाईंनी त्यांचा संभाळ केला. शरीराने पंगू असले तरी मन मात्र गगनभरारी घेणारे होते. घरची गरिबी आणि पंगूपणा यामुळे ते शिक्षणाला पारखे झाले. ते नाशिक येथे सावरकर बंधूंच्या संपर्कात आले. त्यांची प्रतिभा यावेळी बहरू लागली होती.

सुरुवातीला शृंगारिक काव्य आणि लावण्या करणारे गोविंद सावरकरांचे संपर्कात आले आणि कवितेत देशभक्ती स्फुरू लागली. त्याच वेळी सावरकरांनी क्रांतिकार्यासाठी मित्रमंडळाची स्थापन केली होती, त्याचे कवी गोविंद’ सदस्य झाले त्याच्या लेखणीतून देशभक्तीचे पोवाडे येऊ लागले. त्यांचे पोवाडे बाबाराव सावरकरांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली व जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यावरून त्यांचे काव्य किती जहाल असेल याची कल्पना येते. ‘लघुअभिनव मालेची पुष्पे’ म्हणून त्यांचे काव्य नवभारत मंडळाकडून प्रकाशित होऊ लागले.

“बाजीप्रभूचा पोवाडा’, “अफजलखानाचा पोवाडा’, “शिवाजी व मावळे यांचा संवाद’ हे त्यांचे पोवाडे क्रांतिकारकांत लोकप्रिय होऊ लागले. सावरकरांनी त्यांना स्वातंत्र्य शाहीर ही बिरुदावली दिली. या वेळी बाबारावांना झालेल्या अटकेमुळे ते कष्टी झाले व त्यांची लेखणी थंडावली.त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता व पोवाडे पोलिसांनी जप्त केले.

अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात कवी गोविंद प्रमुख होते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे स्वातंत्र्य हा विषय केंद्रिभूत त्यांनी स्वातंत्र्य प्रेम आणि वीरतेची सुभाषिते रचली. परंतु 1914 साली टिळकांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या प्रतिभेला पुन्हा पालवी फुटली. टिळकांना शिक्षा झाली असता अमुचा वसंत कोणी नेला’ ही कविता त्यांना स्फुरली होती. तर ते सुटून आल्यावर

मुक्‍या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे
तुझे पवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे ।।

हे काव्य सहजपणे त्यांच्या लेखणीतून उतरले. “रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ असा सवाल करणाऱ्या त्यांच्या तेजस्वी कवितेने पुढील काळात थोडे अध्यात्मिक वळण घेतले व “त्या ज्ञानाहून जगात सुंदर एकच परमेश्‍वर’ ही सरस्वतीची भूपाळीही त्यांनी केली.

स्वतः अपंग होते पण तुरुंगात असलेल्या त्यांच्या मित्रांच्या कुटुंबाचे आधारही झाले होते. त्यांचे निधन होण्याच्या आधी 15 दिवस “सुंदर मी होणार’ ही अतिशय गाजलेली कविता रचलेली होती. यावरून त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली असावी व बहुधा पुढील जन्मात आपण सुंदर सशक्‍त होण्याचे त्यांचे स्वप्न कवितेतून बाहेर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.