विद्यार्थ्यांनो, शाळेत येताना बूट घालू नका!

चिखलमय रस्त्याला वैतागून आंबेगाव येथील शाळेचा अजब निर्णय

पुणे – कात्रज-देहूरोड बायपास महामार्गावर आंबेगाव जवळील सर्व्हिस रस्त्यावर साचलेल्या चिखल व पाण्याचा त्रास शाळकरी मुलांना सोसावा लागत आहे. शाळा प्रशासनही वैतागल्याने अखेर मुलांनी शाळेचे बूट घालण्याऐवजी आता पावसाळी सॅडल घालून यावे, अशा सूचना दिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कात्रज-देहूरोड बायपास महामार्गावर ठिकठिकाणी सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले आहेत. आंबेगाव, जांभूळवाडी कडे जाणारा सर्व्हिस रस्ता हा अत्यंत वर्दळीचा आहे. या सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे तर या रस्त्यावर चिखल आणि पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. याच सर्व्हिस रस्त्यावर पोतदार इंटरनॅशनल स्कूूल आहे. पाचशेहून अधिक विद्यार्थी असणाऱ्या या शाळेच्या दारातच या सर्व्हिस रस्त्यावरील पाणी जमा होते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या चिखलातून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. त्यामुळे शाळेचे बूट खराब होतात त्याला चिखल लागतो. तसेच पाण्यातून येताना सॉक्‍स सुद्धा ओले होतात. हे ओले बूट घालून दिवसभर विद्यार्थ्यांना शाळेत बसावे लागते. त्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर शाळेने सुद्धा पालिका प्रशासनाला हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली; पण अद्याप रस्त्यावरील चिखल व पाणी हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे अखेर शाळा प्रशासनाने मुलांना बूट न घालता पावसाळी सॅडल घालून आला तरी चालेल, अशा सूचना दिल्या आहेत.

प्रत्यक्षात या सर्व्हिस रोडची चाळण झाली आहे. त्याचबरोबर महामार्गावर पावसाळी गटारे नसल्याने पावसाचे सर्व पाणी हे या सर्व्हिस रस्त्यावर येते आणि आंबेगाव पठार येथे सर्व्हिस रोडचा उतार असल्याने पाणी सगळे या उतारावरून येऊन पोतदार शाळेच्या समोरील रस्त्यावर साचते. त्यातच आंबेगाव, नऱ्हेमधील नागरिक या रस्त्याचा वापर करत असल्याने ते कचरा सुद्धा रस्त्याच्या कडेला टाकतात. पावसामुळे हा कचरा कुजतो त्याचा चिखल होऊन हा चिखल वाहत येऊन या सर्व्हिस रस्त्यावर जमा होतो. त्यामुळे या रस्त्यावर पाणी आणि चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पाणी जाण्यासाठी कुठेच गटारे नसल्याने मोठी अडचण होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत आहेच; पण या परिसरातील नागरिकांना चिखल आणि पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)