मुंबई – या अगोदर दोन टप्प्यात रिझर्व्ह बॅंकेने आपल्या मुख्य व्याजदरामध्ये 0.90% ची वाढ केली असतानाच आज पुन्हा रिझर्व्ह बॅंकेच्या पतधारण समितीने व्याजदरामध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे व्यावसायिक बॅंका घर, वाहन आणि इतर व्यवसायिक कर्जावरील व्याजदर पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढविण्याची शक्यता गृहीत धरली जाऊ लागले आहे.
त्यामुळे विविध क्षेत्रावर मध्यम पल्ल्यात परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे. आता रिझर्व्ह बॅंकेचा मुख्य व्याजदर 5.40% इतका झाला आहे. 2019 मध्ये रेपो दर या पातळीवर होता. त्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि करोनावेळी लोकांना मदत व्हावी याकरिता रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली होती.
रिझर्व्ह बॅंकेने मागायचा दर चार टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केला असताना गेल्या सहा महिन्यापासून या महागाईचा दर 6% पेक्षा जास्त असल्यामुळे आणि बॅंक व्याजदरात वाढ करीत नसल्याबद्दल टीका होत असल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून बॅंक व्याज दरात मोठ्या प्रमाणात वाढ करीत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे अजून व्याजदर वाढ थांबलेली नाही. आगामी काळातही व्याजदरात वाढ करण्याची शक्यता खुली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले. व्याजदरात वाढ केली असली तरी आगामी काळामध्ये महागाईचा दर 6.7% या पातळीवर कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणांमध्ये विकासदराच्या अंदाजात बदल केलेला नाही.
चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.2% राहणार आहे आणि तो जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील परिस्थिती फारच खराब असल्यामुळे त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंक रुपयाचे मूल्य आणि इतर बाबीवर बारीक नजर ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील बॅंकांचे आरोग्य उत्तम असून या बॅंका आगामी काळात विकास दराला चालना देतील. भारताकडील परकीय चलनाचा साठा समाधानकारक असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर जास्त परिणाम होणार नाही.