काळजी घ्या : न्यूमोनियातून करोनाचा धोका अधिक

डॉ. गणेश बागडे यांची माहिती; हिवाळ्यात रुग्णांमध्ये मोठी वाढ

  • 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण 30 टक्के

 

पुणे  – हिवाळ्यात न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत: 5 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हे प्रमाण जवळपास 30 टक्के इतके आहे. करोना प्रादूर्भावात हा आजार डॉक्टरांसाठी अतिरिक्त आव्हान ठरत आहे. न्यूमोनिया झालेल्यांना करोना विषाणूची लागण होऊन त्यामध्ये गुंतागुंत होऊ शकते, असे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. गणेश बागडे यांनी व्यक्त केले.

 

 

न्यूमोनिया हा व्हायरल आणि संसर्गजन्य श्वासोच्छवासाचा आजार आहे. जो मुलांना प्रौढांपेक्षा श्वास घेताना अधिक त्रास देतो. कारण ते प्रदूषकांचे प्रमाण अधिकतम असणाऱ्या भू-पातळीच्या जवळ असतात. जे लोक गर्दीच्या ठिकाणी राहतात, ज्यांचे पालक धूम्रपान करतात किंवा बायोमास इंधनांनी स्वयंपाक करुन हवा प्रदूषित करतात, त्यांना जास्त धोका असतो. न्यूमोनिया फुफ्फुसांना कमकुवत करते, त्यामुळे या मुलांना करोनाचा धोका जास्त आहे, अशी माहिती डॉ. बागडे यांनी दिली.

 

 

न्यूमोनिया हा बालपणातील तीव्र श्वसन संक्रमणाचा (एआरआय) सर्वात गंभीर आजार आहे. भारतातील सुमारे 17 टक्के बालकांचा मृत्यू यामुळे होतो. कुपोषण, पहिल्या सहा महिन्यांत स्तनपान न होणे, कमी वजन आणि लसीकरणाच्या अभावामुळे हा आजार होऊ शकतो. एखाद्या मुलास विषाणू, बॅक्टेरिया किंवा बुरशी जसे की स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया व हिमोफिलस इन्फ्लूएंझा प्रकार बी (एचआयबी) या दोन्ही बॅक्टेरियामुळे हा आजार होतो.

 

 

लसीचा अभाव हे मुलांच्या मृत्यूचे कारण…

न्यूमोनियाच्या प्रतिबंधात्मक लसीचा अभाव हे भारतातील मुलांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. नुकतीच देशात न्यूमोकोकल कन्जुगेट लस (पीसीव्ही) सुरू झाल्यामुळे मुलांचा या आजारापासून बचाव करता येईल. लॉकडाउन आणि इतर प्रतिबंधांमुळे यावर्षी नेहमीची लसीकरण प्रक्रिया विस्कळीत झाली. अद्याप करोनाची लस बाजारात उपलब्ध नसल्याने जास्तीत जास्त मुलांना न्यूमोनियाची लस देण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून आम्ही ओपीडीत रुग्णांच्या लसीकरणाचा इतिहास तपासत आहोत, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना खेर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.