पंतप्रधानांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून ट्रेंडिंगवर…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच आणि #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे. या दोन्ही हॅशटॅगवर १० लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.

करोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.


भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत.


#राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख २८ हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर ८ लाख ३७ हजार ट्विट करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.