आमदार पवार : गावपातळीवर योजनांची पोस्टर्स लावण्याच्या सूचना
शिरूर -पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आतापर्यंत नागरिकांना नीट कळली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पीएमआरडीएबाबत नागरिकांना जागृत करून या पीएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या योजनांची ठळक पोस्टर्स ग्रामपंचायत पातळीवर लावावीत, अशी सूचना आमदार अशोक पवार यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली.
शनिवार (दि. 18 रोजी) पंचायत समिती शिरूर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पीएमआरडीएसंदर्भात शिरूर-हवेली तालुक्यातील नियोजित कामे, प्रश्न तसेच समस्या याबाबत चर्चा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, उपसभापती सविता पऱ्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, पीएमआरडी कार्यकारी अभियंता भरत कुमार बाविस्कर, पल्लवी सोनवणे, उपअभियंता दीपाली वाणी, शाखा अभियंता चंद्रशेखर देशमुख, बाबा खंदारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वालेकर, शिवदास उबाळे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, राजेंद्र जगदाळे, जयमाला जकाते, बाजार समिती संचालक बाबाराजे मांढरे, प्रदीप कंद, अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, नगर रचनाकार विवेक उब्बेवार, कनिष्ठ अभियंता अरुण आव्हाड सय्यद, नगर रचनाकार वासुदेव तांबे, समन्वय अधिकारी नितीन सावंत व तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच ग्रामसेवक नागरिक उपस्थित होते.
पीएमआरडीएमध्ये पंतप्रधान आवास योजना, रस्ते, पाणी योजना व इतर मूलभूत सुविधा यांचा समावेश असल्याचे पवार सांगितले. शिरूर तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
पंतप्रधान आवास योजनेत घरकुल बांधण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये शासन देणार आहे. त्यासाठी ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांचे कुठेही पक्के घर असू नये व त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असायला हवे, जेथे घरकुल बांधायचे ती जागा स्वतःची मालकीची असायला हवी. यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येत आहेत.
-नितीन सावंत, समन्वयक, पीएमआरडीए.