दरमहा सरासरी 150 बसेस रस्त्यातच पडताहेत बंद
पुणे – अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या सीएनजी बस “ब्रेकडाऊन’च्या गर्तेत अडकल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सीएनजीच्या नव्या 400 बस ऑगस्टअखेर ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र, यामधील दर महिन्याला सुमारे 150 बस ब्रेकडाऊन होत असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यामुळे पीएमपीच्या नव्या बसेसनाही “ब्रेकडाऊन’चा व्हायरस डसल्याचे दिसून येत आहे.
पीएमपी ताफ्यात सुमारे 2 हजार 200 बस आहेत. यातील बहुतांश बस जुन्या आहेत. तर, 100 हून अधिक बस आयुर्मान संपलेल्या आहेत. संचलनात जुन्या बसमुळे घटणारे उत्पन्न पाहता अधिकाधिक नव्या बस घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून तीन महिन्यांपूर्वी 400 नव्या सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीच्या अनास्थेचा फटका या बसेसनाही बसला आहे.
सर्व्हिस व्हॅनची संख्या अपुरी
शहरात संचलनादरम्यान रस्त्यावर बंद पडणाऱ्या बस संबंधित ठिकाणाहून वर्कशॉपमध्ये आणण्यासाठी सर्व्हिस व्हॅन कार्यरत आहेत. मात्र, ताफ्यातील एकूण बसची संख्या बघता सर्व्हिस व्हॅन अपुऱ्या आहेत. त्या वाढवण्याची मागणी केल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.