पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ला पिंपरी चिंचवड महापालिका संचलन तुटीपोटी आणि विविध प्रकारच्या सवलतीच्या पासपोटी दरमहा साडेदहा कोटी रुपये देणार आहे. हा विषय स्थायी समितीच्या बैठकीत तहकूब करण्यात आला. यामुळे आधीच आर्थिक संकटाशी झुंजत वाहतूक सेवा देणाऱ्या “पीएमपी’ला निधीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. 3) महापालिका भवनात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पीएमपीएल निधीसाठी 2020-21 च्या अंदाजपत्रकात 244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये संचलनतूट 133 कोटी 58 लाख, विविध प्रकारच्या पाससाठी 14 कोटी 59 लाख, बस खऱेदीसाठी 35 कोटी 83 लाख व बस सबसिडीसाठी 60 कोटी असा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. या रक्कमेतून संचलनतूट पोटी प्रतिमहा 9 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच सवलतीचे पास दिल्यापोटी 1 कोटी 50 लाख रुपये असे 10 कोटी 50 लाख रुपये दरमहा देण्याचे नियोजन आहे. परंतु हा विषय “स्थायी’च्या बैठकीत तहकूब करण्यात आला.
दोन महिन्यांनंतर पिंपरी-चिंचवड शहरात “पीएमपी’ची बससेवा सुरु झाली आहे. परंतु प्रवासी नेण्यावर आलेल्या मर्यादेमुळे “पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न अवघ्या दीड लाखांवर येऊन ठेपले आहे. परंतु रोजचा खर्च आठ ते दहा लाख इतका आहे. त्यामुळे महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीकडे “पीएमपी’ डोळे लावून बसले होते. परंतु स्थायीमध्ये हा विषय तहकूब झाल्याने “पीएमपी’च्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
सन 2020-21 च्या अंदाजित संचलन तुटीचे लेखापरीक्षण होऊन तूट कायम होईपर्यंत एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर 11 महिने अदा केली जाणार आहे. त्याअनुषंगाने मे महिन्याचा निधी पीएमपीएल प्रशासनाला अदा करण्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. हा विषय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत तहकूब करण्यात आला.