पीएमपीचा प्रवाशांना आर्थिक दिलासा

"वन रुट पास'च्या दरात घट : कमी अंतराच्या मार्गासाठीदेखील मिळणार पास

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) “वन रुट पास’साठी आकारण्यात येणारा दर कमी करण्यात येणार आहे. आता 24 दिवसांच्या शुल्काऐवजी केवळ 22 दिवसांसाठीचे शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय, कमी अंतराच्या मार्गासाठीदेखील पास देण्यात येणार असल्याने प्रवाशांना पासच्या शुल्काबाबत दिलासा मिळणार आहे.

मार्गांच्या अंतरांनुसार बसपासचे दर ठरवण्यात येतात. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाने मार्च 2020 मध्ये “वन रुट’ पासचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाससाठी 24 दिवसांऐवजी 22 दिवसांसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे.
येत्या काळात “वन रुट’ पासमध्ये 40 ते 100 रुपयांची बचत होणार आहे.

440 रुपये, 660 रुपये, 880 रुपये आणि 1100 रुपये असा दर यापुढे आकारण्यात येणार आहे. याशिवाय, पाच रुपये तिकीट असणाऱ्या मार्गांसाठी यापूर्वी “वन रुट’ पास देण्यात येत नव्हते. 10,15,20 रुपयांचे तिकीट असल्यास पास देण्यात येत होता. मात्र, प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेता, पाच रुपये तिकीटदरासाठी देखील “वन रुट’ पास देण्यात येणार आहे. यासाठी 220 रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.

पास वितरण सुरू…

मनपाकडून पास छपाई झाली नसल्याने आणि लॉकडाऊनमुळे पास वितरण प्रलंबित होते. आता नवीन छपाईचे पास प्राप्त झाल्याने 16 सप्टेंबरपासून पास केंद्रांवर पासची विक्री सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.