पालिकेसमोरच पीएमपीच्या बेशिस्तीचे दर्शन

पुणे – महापालिका भवनाच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच पीएमपीएमएलच्या वेड्यावाकड्या लावलेल्या बसेसमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तर, यामुळे इतर वाहनचालकांनाही जाच सहन करावा लागत आहे.

मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतूक विस्कळित झालेल्या या रस्त्यावर बस थांब्यांचे नियोजन न केल्याने बसेस अक्षरश: रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहतात. एकामागे एक बस थांबत असल्याने कोणती बस आली आणि कोणती निघणार, हे प्रवाशांना समजत नसल्याने तेही रस्त्यावरच येऊन उभे राहतात. या प्रकारामुळे याठिकाणी छोटेमोठे अपघात होत असून, आता केवळ जीव जाण्याचीच वाट पीएमपीएमएल प्रशासन पाहात आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महापालिका भवनच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वारातच पीएमपीएमएलचे बसस्थानक आहे. या रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोसाठी कॉलम उभारण्याचे काम सुरू असल्याने दुभाजकाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग केल्याने निम्मा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. अशातच विस्तारीत महापालिका भवन इमारतीच्या सीमाभिंतीपासून 25 फुटांवर प्रांगणात स्टीलचे बसथांबे बसविले आहेत. यामुळे त्या बसथांब्याची समोरची बाजू ते रस्त्याच्या दिशेने चार-चार बसेस शेजारी उभ्या केल्या जातात. या बसेस रस्त्याचा अर्धा भाग व्यापतात.

प्रशासनाच्या दुर्लक्षाने वैताग
येथे शेवटचा थांबा असल्याने बसेस काहीवेळ जागेवरच उभ्या असतात. त्यामुळे प्रवासीही रस्त्यावरच मोकळ्या जागेत उभे राहतात. विशेष असे की महापालिका भवनमध्ये येणाऱ्या चारचाकी मोटारी आणि दुचाकी चालक बरेचदा दोन बसेसमधील मोकळ्या जागेतून डावीकडे महापालिकेच्या इमारतीखालील पार्किंगकडे वळतात. तर ज्यावेळी तीन ते चार बसेस शेजारी उभ्या राहातात, त्यावेळी अन्य वाहनांना रस्ता अपुरा पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडीही होते. यामुळे बरेचदा छोटे मोठे अपघातही होतात. येथील जागेचा योग्य वापर केला जात नसल्याने हा प्रकार घडत आहे. परंतु, पीएमपीएमएल प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)