कमी उत्पन्नाच्या मार्गांवर पीएमपीकडून “ब्रोकन पद्धत’ 

पाहणी सुरू; दुपारी 1 ते 4 कालावधीत मार्गावरील बस बंद

तोटा कमी करण्याचा प्रयत्न; परंतु नागरिकांना होणार त्रास

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कमी उत्पन्न असलेल्या मार्गांवरील तोटा कमी करण्यासाठी “ब्रोकन पद्धत’ स्वीकारली आहे. यानुसार या मार्गांवर सकाळी व सायंकाळी कामाच्या वेळेतच बसेस सोडण्यात येत आहेत. तर, दुपारच्या वेळी बससेला व चालक वाहकांना विश्रांती देण्यात येत आहे. यामुळे पीएमपीचा तोटा कमी होत असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मात्र पीएमपीच्या या निर्णयाचा मोठा फटका बसणार असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे फावणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला सार्वजनिक वाहतूक सुविधा देणाऱ्या पीएमपीला दिवसेंदिवस तोटा सहन करावा लागत आहे. दोन्ही शहरात सुमारे 375 पीएमपीचे मार्ग आहेत. तर, या मार्गावर प्रतिदिन पीएमपी बसेसच्या 18 ते 19 हजार फेऱ्या होतात. मात्र, यातील अनेक मार्गावर बसेसचे उत्पन्न खूपच कमी आहे. यामुळे याचा तोटा पीएमपीला सहन करावा लागत आहे. यामुळेच अशा मार्गांची पाहणी पीएमपीकडून सुरु करण्यात आली असून कमी उत्पन्न असणाऱ्या मार्गावरील बस फेऱ्या दुपारी ब्रोकन पद्धतीने बंद करण्यात येत आहेत.

ही पद्धत सर्वप्रथम पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात सुरु करण्यात आली होती. याच पद्धतीला परत सुरु करण्यात येत आहे. यासाठी पीएमपीकडून मार्ग समितीची स्थापना करण्यात आली असून 30 टक्‍क्‍यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मार्गांची पाहणी करुन त्यामार्गावरील बसेसना दुपारी 1 ते 4 कालावधीत विश्रांती देण्यात येणार आहे. तर, या बसेस ज्या मार्गावर जादा गर्दी आहे त्याठिकाणी पाठवण्यात येणार असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पद्धतीने पीएमपीला फायदा होत असून येत्या काळात कमी उत्पन्नाच्या मार्गावर या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.

ज्या मार्गांवर पीएमपीला उत्पन्न कमी मिळत आहे. त्या मार्गावरील बसचालक व वाहकांना दुपारच्या वेळी विश्रांती देण्यात येत आहे. तर, त्याऐवजी गर्दीच्या मार्गावर जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामुळे पीएमपीचा तोटा कमी होत असून जिथे आवश्‍यकता आहे तिथे जादा बस सोडण्यात येऊन जादा उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न आहे. कमी उत्पन्न असलेल्या मार्गांची पाहणी सुरू असून येत्या काळात या मार्गांवर ब्रोकन पद्धत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अनंत वाघमारे यांनी दिली. (अध्यक्ष मार्ग समिती आणि बीआरटी प्रमुख)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.