महापालिकेच्या अंदाजपत्रकात 244 कोटींची तरतूद
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात यंदा मोठ्या संख्येने बसेस दाखल होणार आहेत. आजघडीला पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बसेस आहेत. मात्र, प्रत्यक्षात मार्गावर दीडच हजार बसेस धावतात. यामुळे काही मार्गावर बसेस अपुऱ्या पडत आहेत. यामुळे चालू वर्षात सीएनजी, ई-बस व इतर अशा एकूण 984 बसेस पीएमपीच्या ताफ्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केलेल्या अर्थसंकल्पात पीएमपीसाठी 244 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची धुरा पीएमपी प्रशासनाकडे आहे. यात, पुणे महापालिकेचा 60 टक्के तर, पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा 40 टक्के असा वाटा आहे. यानुसार दोन्ही शहरांना वाहतूक सेवा देण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची आहे. अलिकडच्या काळात नवीन ई-बसेस व सीएनजी बसेस विकत घेण्यात येत आहेत. सेंन्ट्रल इंस्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआयटी) ने पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला किमान तीन हजार बसेस आवश्यक असल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्या पीएमपीकडे 2 हजारच बसेस असून त्यापैकीही फक्त दीड हजारच बसेस प्रत्यक्ष मार्गावर धावत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
यावर्षी पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या आयुर्मान संपलेलेल्या 300 बसेस ताफ्यातून बाहेर काढण्यात येणार आहेत. तर, 984 बसेस नव्याने ताफ्यात दाखल होणार आहे. यात 400 बसेस ह्या बीआरटी मार्गात धावू शकतील. यात, 440 सीएनजी मार्चअखेर, 44 बसेस एप्रिलाअखेर भाडेतत्वार तर, 150 ईलक्ट्रिक बसेस अनुदानातून डिसेंबरपर्यंत व 350 ईलक्ट्रिक बसेस पीएमपीकडून जानेवारी 2021 पर्यंत विकत घेण्यात येणार आहे.
ई-बस खरेदीसाठी 95 कोटी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2020-21 च्या अंदाजपत्रकात पीएमपीसाठी 244 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात 150 ई- बस खरेदीसाठी 95 कोटी रुपये तर थांबे व देखभाल दुरुस्तीसाठी 1 कोटी 49 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.