पुणे – लॉकडाऊनमुळे बंद असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासी सेवा
3 तारखेपासून सुरू झाली. मात्र यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. ज्येष्ठांची मागणी लक्षात घेता प्रशासनाने 65 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारपासून बस प्रवासास मुभा दिली आहे.
मार्चपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची प्रवासी सेवा स्थगित केली होती. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासास परवानगी होती. प्रवाशांची मागणी लक्षात प्रशासनाने 3 सप्टेंबरपासून 25 टक्के प्रवासी सेवा “रिस्टार्ट’ केली. मात्र, आरोग्याच्या कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. रिक्षाचालकांनी जादाभाडे आकारणे, प्रवासास खासगी वाहन नसणे आदी कारणांमुळे ज्येष्ठांकडून पीएमपी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी प्रशासनाने बसमध्ये 65 वर्षांपुढील नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी 8 सप्टेंबरपासून होणार आहे. याबाबत आगारांनादेखील सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ज्येष्ठांना करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका असतो. याच अनुषंगाने पीएमपीने त्यांच्या प्रवासावर बंधने घातली होती. मात्र, ज्येष्ठ प्रवाशांकडून बस प्रवासासाठी परवानगी देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने “बेस्ट’सह अन्य शहरांतील बससेवांबाबतची माहिती घेतली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.
– डॉ. राजेंद्र जगताप, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी