पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची बससेवा 3 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात 190 मार्गांवर 421 बसेसचे संचलन सुरू होणार आहे. यासाठी पीएमपी प्रशासन देखील सज्ज असून, बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून पीएमपीची सेवा बंद होती. या कालावधीत पीएमपीच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा देण्यात येत होती. लॉकडाऊनच्या नियमांना शिथिलता दिल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील व्यवहार सुरळीत झाले. मात्र सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने, नागरिकांची गैरसोय होत होती.
परंतु, दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बसेसचे संचलन सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येत नव्हती. ऑगस्टमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी देखील पीएमपी सुरू करण्यास तत्वत: मान्यता दिली होती.
याबाबत दैनिक “प्रभात’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. महापालिकांचे आयुक्त आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दि.3 सप्टेंबरपासून पीएमपीची सेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. बुधवारी याबाबतची सविस्तर माहिती पीएमपीकडूनजाहीर करण्यात आली.
अशी प्रवाशांसाठी नियमावली
– स्थानकांवर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आखलेल्या वर्तुळांवर थांबावे
– बसमध्ये केवळ 22 जणांना प्रवास करता येणार असून, मार्किंग केलेल्या आसनांचा वापर करावा
– 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील प्रवाशांना बस प्रवासास परवानगी नाही
– मास्क वापरणे अनिवार्य
– मिडी बसमध्ये 17 प्रवाशांना परवानगी
– सीएनजी (मोठ्या) बसमध्ये 17 प्रवाशांना बसून आणि 3 प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास परवानगी