पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे कामकाज दिवसेंदिवस “स्मार्ट’ होत आहे. मात्र, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना पदपथावरूनच काम करावे लागत आहे. शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकाच्या कामासाठी याठिकाणी असणारे पीएमपीचे शेड काढले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे.
शिवाजीनगर येथून शहराच्या विविध भागांत बसेस सोडण्यात येतात. शहराचे मध्यवर्ती बसस्थानक म्हणून शिवाजीनगरची ओळख आहे. मात्र, सध्या याच मध्यवर्ती स्थानकातील कर्मचारी फूटपाथवरून बसेसचे संचलन करत आहेत.
शिवाजीनगरला एसटी स्टॅन्डच्या जागेत मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे एसटी आगार आणि पीएमपीचे बसथांब्याच्या जागा हलविल्या आहेत. यामध्ये एसटीला वाकडेवाडी येथे नवीन आगार मिळाले. पण पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र फूटपाथचाच आधार घ्यावा लागत आहे. सिमला ऑफीससमोरील फूटपाथवर बाक ठेवून पीएमपीच्या संचालनाचे काम सुरू आहे.
पीएमपीचे कर्मचारी सध्या फूटपाथवरून काम करत असल्याच्या वृत्ताला वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दुजोरा दिला आहे. कर्मचारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी याठिकाणी लवकरच शेड बसविण्यात येणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.