कचरा वाहतुकीसाठी दिले 125 चालक
कामगारांच्या आंदोलनामुळे प्रश्न बिकट
पुणे – महापालिकेतील कंत्राटी कामगारांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन व वेतनातील तफावत अदा करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार मंचाने सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून कचरा वाहतूक वाहनांवरील 700 ते 800 वाहनचालक या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कचरा वाहतुकीसाठी पालिकेने पीएमपीच्या 125 चालकांना घेतले आहे. याशिवाय, काही अधिकाऱ्यांच्या वाहनांचे चालक आणि पालिकेचे नियमित चालक असे सुमारे 250 कर्मचारी घेऊन मंगळवारी कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
महापालिकेकडे सध्या पाच हजारांहून अधिक कंत्राटी कामगार असून, यामध्ये आठशेहून अधिक कंत्राटी चालक आहेत. या कामगारांना राज्य शासनाने किमान वेतन देण्याबाबतचे आदेश फेब्रुवारीमध्ये काढले असून, सेवकांना या आदेशाप्रमाणे वेतन मिळत नाही. वारंवार बैठका घेऊन तसेच प्रशासनाने आश्वासने देऊनही हे किमान वेतन मिळालेले नाही. यामुळे बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. त्याचा फटका वाहनांद्वारे कचरा वाहतुकीला बसला. मात्र, या कामगारांना आवश्यक वेतन पालिका ठेकेदारांना देते. मात्र, ठेकेदार त्यांना ते देत नाही. याचा पालिकेशी संबंध नसल्याने पालिकेने याप्रकरणी मध्यस्थी न करण्याचा निर्णय घेतला आहे.