पुणे, दि. 6 -पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा फटका पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बसला असून, नुकत्याच झालेल्या चार रुपये सीनजी दरवाढीमुळे पीएमपीच्या खर्चात दररोज 3 लाख 88 हजारांची वाढ झाली आहे. महिन्याला एक कोटी 16 लाख रुपयांची वाढ होणार आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1540 सीएनजी बस आहेत. या बससाठी दररोज सरासरी 95 हजार किलो सीएनजी गॅसचा वापर होतो. नुकतेच सीएनजीचे दर चार रुपयांनी वाढले असून, सीएनजीचे दर 91 रुपयांवर पोहचले आहेत. पण पीएमपीला किलोमागे एक रुपया 20 पैसे सूट दिली जाते. तरीपण पीएमपीला किलोसाठी 89 रुपये 80 पैसे मोजावे लागत आहेत. जानेवारीच्या तुलनेत सीएनजीच्या दरात तब्बल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पीएमपीच्या खर्चात वाढ झाली आहे. पीएमपीला जानेवारीमध्ये सरासरी 61 लाख 56 हजार रुपये दिवसाला खर्च होत होता. आता तोच खर्च 85 लाख 31 हजारांवर गेला आहे. पीएमपीचा दिवसाला 23 लाख 75 हजार रुपये सीएनजीचा खर्च वाढला आहे, तर ऑक्टोबरमध्ये जानेवारीच्या तुलनेत सात कोटी 12 लाख 50 हजारांनी वाढ झाली आहे. पीएमपीची 2021-22 मध्ये 718 कोटी रुपये संचलन तूट झाली आहे. सीएनजी दरवाढीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.
जानेवारीच्या तुलनेत सीएनजी दरात विक्रमी वाढ झाली आहे. सीएनजी दरवाढीचा फटका पीएमपीला बसला असून, पीएमपीचा इंधनावरील खर्च वाढला आहे. त्यामुळे संचलन तुटीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
-राजेश रूपनवर, भांडार प्रमुख, पीएमपी